नर्मदालयाच्या वसतिगृहात मध्य प्रदेशतील अलिराजपूर, बडवानी आणि खरगोन या जिल्ह्यातील साठ वनवासी विद्यार्थी राहतात. यापैकी अलिराजपूर आणि बडवानी जिल्ह्यातील मुले नर्मदा परिक्रमा मार्गातील प्रसिद्ध अशा ‘शूलपाणी की झाडी’ च्या सातपुडा आणि विंध्याचल पर्वताच्या अतिदुर्गम भागातील आहेत. तिथे सरकारी शाळा आहेत पण शाळेच्या फक्त इमारतीच अनेकदा बघायला मिळतात. अनेक ठिकाणी पाचवी किंवा आठवीपर्यंतच शाळा आहेत. त्यामुळे शिक्षक स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथे राहू इच्छित नाहीत. अशी ही अनेक मुलं नर्मदालयाच्या वसतिगृहात राहू इच्छितात. आमच्याकडे ते येतात तेंव्हा कुपोषणाच्या जोडीला अंगभर खरूजही घेऊन येतात. योग्य पोषक आहार आणि वैद्यकीय उपचाराने सहा महिन्यातच त्यांच्या तब्येती सुधारतात आणि खरूजही जाते. शालेय अभ्यासाच्या बाबतीत सुरवातीला आनंदच असतो. काही ठिकाणी पाचवी पर्यन्त तर काही ठिकाणी आठवीपर्यन्त सरकारी

शाळेत शिक्षण होऊनही त्यांना जेमतेम हिन्दी मुळाक्षरेच वाचता येतात. पण अत्यंत चुणचुणीत अशी ही मुलं अगदी गुण्यागोविंदाने नर्मदालयात राहतात. नर्मदालय परिवाराचे ते आता अविभाज्य अंग झाले आहेत. अभ्यासाच्या बाबतीत त्यांची प्रगती इतर मुलांपेक्षा उल्लेखनीय असते. अभ्यासाबरोबरच नववी-दहावीची मुले काही व्यवसाय कौशल्येही शिकतात. सध्या चौदा मुले महाराष्ट्रातील पाबळ येथील विज्ञान आश्रमा चा ‘डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी’ हा एक वर्षाचा ऑन लाइन कोर्स करत आहेत.

कोविड 19 मुळे 25 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झाले. नाईलाजाने या मुलांना त्यांच्या घरी पाठवावे लागले. या घटनेला आता सहा महीने होऊन गेले. मुलांना नर्मदालयाची आठवण यायची आणि आम्हालाही मुलांची आठवण यायची. अनेक पालकांचे फोन येत. “दीदी, मुलांच्या शाळेचं- अभ्यासाचं काय करायचं ? आमच्याकडे मोबईलला रेंज मिळत नाही. तुम्हाला फोन करायचा तरी खूप दूरवर जावं लागतं. सगळ्यांकडे स्मार्ट फोन पण नाहीत. मग मुलांनी ऑनलाइन अभ्यास तरी कसा करायचा ? (खरं तर ही ऑन लाइन अभ्यास काय भानगड आहे हे त्यांना अजूनही समजलेलंच नाही.) लॉकडाऊन नंतर आर्थिक परिस्थिती इतकी वाईट झालीय की मुलांची खाण्यापिण्याची पण आबाळ होतेय.” हे सगळं ऐकूनच जीव व्याकुळ व्हायचा. शेवटी मागच्या आठवड्यात हिम्मत करून या मुलांच्या घरी गेले. सोबत आमचा प्रकल्प समन्वयक दिग्विजय आणि शंकर केवट- उदित केवट हे दोन कार्यकर्ते होते. बडवानी जिल्ह्यातील बोरखेडी, कुली, लाईझापी या गावांना भेटी देत आम्ही सेमलेटला पोहोचलो. सेमलेट या गावापर्यंत आता चांगला रस्ता झाला आहे. तिथपर्यंत आम्ही गाडीने गेलो. सेमलेट हे शूलपाणीच्याच जंगलातलं गाव. इथली पण काही मुलं नर्मदालयात राहतात. संध्याकाळी एक प्रचंड मोठ्या वटवृक्षाखाली गावकऱ्यांशी संवाद झाला. त्यात लोकांनी मुलांच्या शिक्षणविषयक अडचणी सांगितल्या. गावात सरकारी शाळा आहे पण शिक्षक एकच. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून ते काय-किती आणि कसे शिकवणार ? त्यामुळे आठवीपर्यन्त मुलांना फक्त पाढे आणि थोडं फार हिन्दी लिहता वाचता येतं. याला उपाय काय ? त्यांनी मलाच प्रश्न केला. या संवादात गावातल्या सरकारी शाळेतले शिक्षक भगत सर पण होते. ते म्हणाले, “दीदी, या गावात आदिवासींच्या जोडीने मानकर नावाचा एक समाज आहे. त्यांची शंभर –सव्वाशे मुलं दिवसभर नुसती भटकत असतात पण शाळेत येत नाहीत. शाळेत प्रवेश देखील घेत नाहीत. त्यांचं काय करायचं ? शाळेत त्यांना निदान दुपारचं पोटभर जेवण आणि दोन गणवेश तरी मिळतील. त्याचीही त्यांना पर्वा नाही.” शिक्षण विषयक अडचणींबरोबरच या गावा संदर्भात एक नवीन माहिती ऐकायला मिळाली. महाराष्ट्रातल्या शिरपूर जवळ श्री वनसिंगबाबा आणि सुरेखा माताजी नावाच्या आदिवासी दांपत्याने शिवपंथ सुरू केला आहे. वनसिंग बाबा आता हयात नाहीत. ते कार्य आता त्यांच्या पत्नी सुरेखा माताजींनी सुरू ठेवलं आहे. त्यांची दीक्षा गावातल्या ऐंशी टक्के लोकांनी घेतलीय. दीक्षा घेतांना दारू सोडायची सुद्धा शपथ घ्यावी लागते. दर कोजागिरी पौर्णिमेला या शिवपंथी लोकांचा मेळावा वेगवेगळ्या ठिकाणी भरतो. 100% आदिवासी वस्ती असलेल्या ह्या गावात ऐंशी टक्के लोकांनी दारू सोडली आहे ही क्रांतीच म्हणावी लागेल. गावात आता नियमितपणे जप आणि भजन कीर्तन होते. पण गावात मंदिरच नाही ही खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. आमच्याकडे इतके पैसे नाहीत त्यामुळे मंदिर बांधू शकत नाही.

मी पर्याय दिला. “जप-साधनेसाठी काही भव्य मंदिरच हवं का ? श्रमदानातून आपण एक ओटा तयार करू. त्यावर याच गावची लेपाच्या नर्मदालयात शिकणारी काही मुलं येऊन पत्रे टाकून शेड तयार करून देतील. ते आता फॅब्रिकेशनच्या कामात तरबेज झालेत. पत्र्याच्या व्यवस्थेसाठी मी काही प्रयत्न करीन. पण दिवसभर त्या ठिकाणी गावातली मुलं शिकायला येतील. संध्याकाळी भजन कीर्तन. तिथे आपण एक नि:शुल्क कोचिंग क्लास सुरू करू. मामाच्या घरी राहून बारावीपर्यन्त शिकलेली एक मुलगी या गावात आहे. ती या छोट्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेईल. तिला आम्ही दरमहा काही मानधन देऊ. म्हणजे तिलाही आर्थिक मदत होईल आणि मुलांचा अभ्यासही होईल. त्या मुलीशी आज आमचं बोलणं झालंय.” मला वाटलं गावकरी म्हणतील की या पत्र्याच्या शेड संदर्भात आम्ही विचार करून नंतर निर्णय देऊ. पण लगेचच श्री. नासऱ्याभाई म्हणाले, “दीदी, जमीन मी देतो.” सरपंच म्हणाले, “विटा आणि सीमेंटची व्यवस्था मी करतो.”

आमचा एक विद्यार्थी सूरजकडे रात्रीचं जेवण झालं. गावात त्या दिवशी नेमकी वीज गुल होती. प्रचंड उकडत होतं म्हणून त्याच्या काकानी आमची झोपायची व्यवस्था अंगणात करून दिली. फार दिवसांनी खाटेवर झोपायचं आणि चांदण्यांनी भरलेलं आकाश बघत झोपी जायचं सुख मिळालं. पण प्रत्येक सुखाची किंमत जणू मोजायलाच हवी असा बहुधा नियतीने माझ्याशी करार केलाय. कुठल्याशा एका किडयाने गळा आणि खांद्यावर चावल्याने भरपूर फोड आले होते. पहाटे चार वाजता नेहमीप्रमाणे जाग आली. खाटेवर उठून बसले. माझ्या हालचालीने खाटेखाली रात्रभर बसलेला एक बेवारशी कुत्रा देखील उठून उभा राहिला. रात्री झोपतांना उगीचच मनात एक विचार आला होता की जंगलातल्या या छोट्याश्या वस्तीत आपण असं उघड्यावर झोपतो आहोत. जंगली जनावरं किंवा साप तर येणार नाही ना ? म्हणूनच त्या कुत्र्याने माझी रात्रभर राखण केली असावी.

भादल या गावी जायचं म्हणून सकाळी जरा लवकरच आम्ही निघालो. आमच्याबरोबर गावचे सरपंच श्री उमराव सिंह, नासऱ्याभाई, भगत सर, लाईझापीचे रणजित सर आणि खेरवानीचे जयराम सर बरोबर होते. सेमलेट ते भादल पक्की सडक नाही, डोंगरातून जाणारा वळणावळणाचा ओबडखबड रस्ता. कधी उतार तर कधी उभी चढण अशी की छातीत धडकीच भरावी. उजव्या बाजूला खोल दरी आणि दूरवर सरदार सरोवर धरणाच्या बॅक वॉटर्सचे विलोभनीय दृश्य. अशा रस्त्याने पायी जाणं सोपं. पण मोटर सायकलवर बसून दहा पंधरा किलोमीटरचा प्रवास या रस्त्याने करणं म्हणजे मोठं धाडसच. गेल्या दहा वर्षात दुचाकी वाहनावर बसले नव्हते. “नर्मदे हर” म्हणत आम्ही सगळेच मोटर सायकलवर स्वार झालो. माझा भार नासऱ्याभाईनी स्वत:च्या मोटर सायकलवर घेतला. त्यांच्या धाडसाला दाद देत आम्ही निघालो. पावसाळ्याचे दिवस असल्याने वाटेत अनेक छोटे मोठे नाले लागले. तिथे बाईकवरून उतरावे लागे. अनेक ठिकाणी निसरडं झालं होतं. सांभाळून पावलं टाकावी लागत. दहाच किलोमीटरचा रस्ता पण भादलला पोहोचायला आम्हाला तब्बल दीड तास लागला. वाटेत मला एक दोन ठिकाणी चक्कर पण आली. आजवर कितीही कठीण प्रवास असला तरी मला कधी चक्कर आली नव्हती. मग आठवलं की आदल्या दिवशी ब्लड प्रेशरची गोळी घ्यायला विसरले होते. वाढलं असेल का ब्लड प्रेशर ? वाटेत एका झोपडीजवळ आम्ही थोडं थांबलो. तिथल्या गृहिणीने तत्परतेने पाणी तर पाजलंच पण बाजरीची भाकरी आणि बकरीच्या दुधाचाही आग्रह केला.

लेपाच्या नर्मदालयात शिकणारा भादलचा सहा वर्षाचा विश्वास गेल्या दोन महिन्यांपासून दिग्विजयला “भय्या, मुझे लेपा कब ले जाओगे ?” असा फोन करतो आहे. त्याच्या घरी मोबाईलला रेंज नाही.तो वडलांना दूर टेकडीवर घेऊन जातो. तिथे रेंज मिळते. मग हा संवाद होतो. फोन करून दिग्विजयला भंडावून सोडणारा लहानगा विश्वास आम्हाला भेटल्यावर मात्र संकोचला. आमच्यासाठी त्याने शेतातून काकड्या आणि मक्याची कणसं आणली होती. भादलला अनेक गावकरी भेटायला आले होते. विषय तोच. मुलांचे शिक्षण. सरकारी शाळा आहे पण मास्तर क्वचितच दर्शन देतात. मेधाताई पाटकरांची पाचवी पर्यन्त शिक्षण देणारी जीवन शाळा आहे. पण पुढे काय ? आता कोविड 19 मुळे तर मार्च 2020 पासून सगळ्याच शाळा बंद आहेत. इतक्या दुर्गम भागात राहणाऱ्या आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या आदिवासी बांधवांना ऑनलाइन अभ्यासाबद्दल काही सांगणं हा तर माझाच मूर्खपणा ठरला असता. खरं तर हे क्षेत्र कोविड 19 च्या बाबतीत ‘ग्रीन झोन’ आहे. गावात दहावी झालेला एक मुलगा आहे. तो मुलांचा अभ्यास घ्यायला तयार झाला पण जागेचं काय करायचं ? जुलवानियाच्या कुण्या एका शेटजीने गावात हनुमानाची मूर्ती दिलीय. गावकऱ्यांनी त्यावर छोटीशी शेड बांधली आहे. तिथे हा वर्ग सुरू करायचं ठरलं. भादल हे सरदार सरोवराच्या डूब क्षेत्रात येणारं गाव. ज्यांची घरं धरणाच्या पाण्यात गेली त्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली म्हणे. पण ते गाव सोडून गेले. उरलेली मंडळी अजूनही कष्टमय जीवन जगताहेत. धरण विस्थापित आणि नुकसान भरपाई या बाबतीतलं माझं ज्ञान शून्य. तो माझा विषयही नाही. त्यामुळे आपण फक्त मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात बोलूया असे म्हणत त्या ऐकीव आकडेवारीवर कुठलीही प्रतिक्रिया मी दिली नाही.

बाजरीच्या भाकरीवर तेल-मीठ-मिरचीपुड असा माझा आवडता पाहुणचार खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. बाईकच्या चाकांबरोबरच माझं विचारचक्र देखील चालू झालं. स्वातंत्र्य मिळून आता त्र्याहत्तर वर्ष होऊन गेलीत. शिक्षणाचा सूर्योदय या आमच्या वनवासी बांधवांच्या आयुष्यात कधी होणार ? राज्य कुठलंही असो - शिक्षण आणि उपजीविकेचं साधन नाही मिळालं तर मग यांच्यातूनच नक्षलवादी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

गेली दहा वर्षे नर्मदालय या आमच्या अनौपचारिक शिक्षण केंद्र आणि रामकृष्ण सारदा निकेतन या औपचारिक शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून या वनवासी विद्यार्थ्यांसाठी आपण वसतिगृहाची सोय लेपा येथे केली आहे. साठ वनवासी विद्यार्थी याचा नि:शुल्क लाभ घेत आहेत. वेल्डिंग, सुतारकाम, गोशाळा व्यवस्थापन, जैविक शेती, शिवणकाम, किरकोळ वाहन दुरुस्ती या सारख्या अनेक गोष्टी ते नर्मदालयात राहून शिकत आहेत. रामकृष्ण सारदा निकेतन या आमच्या शाळेचे संपूर्ण फर्निचर प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थीच बनवतात. शाळेच्या तीन मजली इमारतीचे चोवीस टॉयलेट्स आणि वसतिगृहाच्या आठ टॉयलेट्स आणि आठ बाथरूम्सचे प्लंबिंगचे पूर्ण काम आमच्या या मुलांनीच केले. या जीवन शिक्षणातून त्यांची आत्म-निर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. अधून मधून आम्ही या मुलांच्या घरी जात असतो. तिथे घेतलेले काही फोटो, व्हिडिओ क्लिप्स् एकत्र करून आमचा कार्यकर्ता नीलेश याने एक छोटी फिल्म बनवली आहे. आपल्या सगळ्यांसाठी ती प्रस्तुत करत आहोत. नीलेशचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्या प्रतिक्रिया, सूचना त्याला नर्मदालयाच्या या फेसबूकवर अवश्य कळवा.

भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश