Donate

सुश्री भारती ठाकूर – एक झपाटलेलं व्यक्तिमत्व!

सुश्री भारती ठाकूर – एक झपाटलेलं व्यक्तिमत्व!


जीवनदायिनी पुण्यसलिला नर्मदा माता ! “जो जे वांछील तो ते लाहो’ – ज्ञानेश्वर माउलींची ही ओळ सार्थ करणारी. तिचे गुण वर्णन करण्यासाठी शब्द थिटे पडतात. या नर्मदा मैयाच्या तटाकी आपल्याला स्तिमित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. असंच एक आश्चर्य ‘नर्मदा परिक्रमा’ केलेल्या सुश्री भारती ठाकूर यांच्या कल्पनेतून ‘नर्मदालय’ या रूपात साकार होत आहे. हल्ली शिक्षणासाठी अनेक शाळा आहेत. संस्थानं आहेत. परंतु खेदानं म्हणावं लागतं की तिथे माणसाचं माणूसपण मात्र हरवतंय. ते जपण्याचे प्रयत्न होतांना कुठेच दिसत नाहीत. सूर्यापुढे एखादी लहानशी दिवटी काय करील असे वाटू शकते, पण जिथं सूर्याचा प्रकाश अजिबात पोहचू शकत नाही अशा ठिकाणी तीच लहानशी दिवटी आपल्या कुवतीप्रमाणे तेवत राहून आपल्या आसपासचा परिसर प्रकाशित करते. “नर्मदालय’ हे एका अशाच प्रयत्नाचे नाव आहे, जिथं निरनिराळ्या विषयांबरोबरच हे माणूसपणही जपलं जाईल असे शिक्षण इथे दिलं जातं.

सौम्य स्वभावाच्या धीर गंभीर व तेवढ्याच दृढ इच्छाशक्ती व दूरदृष्टी लाभलेल्या भारतीताईंचे बालपण व औपचारिक शिक्षण नाशिक (महाराष्ट्र) येथे झाले शिक्षणानंतर त्या सरकारी सेवेत रूजू झाल्या. निसर्गप्रेमी असल्यामुळे पक्षी निरीक्षण, गिर्यारोहण, वनस्पती व इतर प्राण्यांबदद्ल माहिती मिळवणे, अभयारण्यांना भेटी हे सर्व त्या मनापासून करीत. त्याच बरोबर प. पू. रामकृष्ण परमहंस, (ठाकुरजी), माताजी (माँ शारदा) व स्वामी विवेकानंद यासारख्या आध्यात्मिक विभूतींचे विचारधन व विचार सान्निध्य त्यांना लाभले. स्वामी रंगनाथानंदजींसारख्या विभूतीकडून त्यांना अनुग्रह मिळाला. आशीर्वाद देताना या त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना “राष्ट्र हीच तुझी देवता आहे, तिचीच सेवा कर”, असा आशीर्वाद दिला.

२००५ साली भारतीताईना जाणवले की परत वळून आपल्या आयुष्याबद्दल जरा विचार करावा. पडताळा घ्यावा की काय मिळविलं, काय गमावलं, पुढे काय करायला हवे. तेव्हा त्यांना प्रकर्षानं जाणवले की आधी नर्मदा परिक्रमा करायला हवी. मनात आलेला संकल्प दोन मैत्रिणीसह लवकरच पूर्ण झाला. ही बाहय यात्रा तर पूर्ण झाली पण नंतर सुरु झाली ती अंतर्यात्रा ! परिक्रमेनं त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं. जगण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यांचं अंतर्मन त्यांना एक वेगळीच साद घालू लागलं व त्यांनी ठरविलं की उर्वरित आयुष्य या नर्मदा माईच्या लेकरांसाठीच समर्पित करायचे. त्या प्रमाणे स्वेच्छा निवृत्ती घेऊन अगदी थोडसं सामान घेऊन नाशिकच्या या गोदावरी कन्येचं नर्मदा मैयाच्या काठी असलेल्या मंडलेश्वर या गावी येणं झालं. सद्गुरु कृपा व परिक्रमा झाल्या नंतरच्या त्यांच्या आयुष्यातील घटना विलक्षण आहेत. त्या स्वत: च म्हणतात की आता त्या घडत असलेल्या घटनांकडे साक्षी भावाने बघता हे घडेल अशी कल्पना त्यांनी कधी केली नव्हती.

गावांमधील परिस्थिती बघून ताई अस्वस्थ व्हायच्या दारू, जुगार स्त्रियांवर होणारे अत्याचार, बाल-विवाह, कुपोषित मुले, स्त्रियांचे आरोग्य इत्यादी बघून त्यांचे अंत:करण व्यथित झाले. सरकारी शाळांची अवस्था दयनीय! आठवी पर्यंत शिक्षण झालेल्या मुलांना स्वत:च नावही लिहिता येऊ नये ही अवस्था! या सर्व चक्रातून बाहेर पडण्याची कुणाची इच्छा शक्ती नाही, तो विचारही नाही. “गांव में तो ऐसा ही होता है दीदी’, असे म्हणत या गोष्टी लाचार पणे स्वीकारायच्या !

ताईंना जाणवलं, की या गोष्टींवर वरवरच्या मलमपट्टीचा काही उपयोग होणार नाही. यांच्या मुळावरच घाव घालायचा आणि त्यासाठी शिक्षण हा एकच उपाय आहे. त्यातूनच विचार प्रक्रिया घडेल तेव्हा परिवर्तन होईल. लहान मुलांपासून या कामाची सुरुवात करायची असा निश्चय त्यांनी केला व आपल्या कामाची सुरुवात केली. तो काळ संघर्षाचा होता. आठ-आठ दहा-दहा मैल पायपीट करायची, कारण या गावांमधे बसेस देखील नव्हत्या आणि आजही नाहीत. घरोघरी जाऊन गावातील स्त्रियांना भेटून मुलांना शाळेत पाठविण्याचा आग्रह करायचा. लेपा नावाच्या गावात त्यांना या सर्व प्रयत्नांती एका धर्मशाळेचा हॉल उपलब्ध झाला व सकाळी आठ ते साडे दहा या वेळेत शाळा सुरु झाली. गाणी, कविता, नृत्य खेळ, छोटी गणितं इ. त्या शिकवू लागल्या स्वच्छतेचं महत्व सांगू लागल्या. त्याच गावातील थोडया फार शिकलेल्या मुलींची मदत त्यांना मिळू लागली. मुलांना शाळा आवडू लागली. गावात लोकांना जाणवले की इथं काही तरी छान घडतयं , मुलांमधे बदल होतोय. फुलातील सगंध लपून राहत नाही. हा सुगंध आसपासच्या गावातही पसरला. सर्वांनाच वाटलं की आपल्याही गावात अशी शाळा हवी.. शिक्षणाबरोबरच आरोग्याचा प्रश्नही महत्वाचा आहे हे लक्षात येऊन वैयक्तिक पातळीवर हे काम न राहता एखादी संस्था हवी हे लक्ष्यात आलं आणि विचार विनिमयानंतर काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन “नर्मदा” या नावानं संस्थेची नोंदणी केली. (Narmada-Nimar Abhyuday Rural Management and Development Association) भारती ताईंचे परिक्रमेचे अनुभव गौतमी प्रकाशन तर्फे पुस्तक रूपात प्रकाशित झाले. बघता-बघता पुस्तकाच्या आठ नऊ आवृत्या संपल्या. लोकांना पुस्तक आवडले व ते वाचून मदतीचा हातही संस्थे कडे येऊ लागले .गावातल्याच एका साधुबाबांनी ताईंचं काम बघून साडे पाच हजार स्क्वे. फीट जागेवर बांधलेला एक आश्रम त्यांना एका सोमवती अमावस्येच्या दिवशी दानपत्र लिहून दान म्हणून दिला. खरंतर ताईंची-त्यांची नीट अशी ओळखही नव्हती. पण त्यांना मुलांमधील बदल जाणवला. ताईंना त्यांच्या कामाची पावती ही अशी मिळाली. मानवातील देवत्वाची ही अनुभूतीच जणू! परमेश्वर स्वत: न येता आपल्या अंशांकडून इथे जगद् व्यापार कसे करवून घेतो याचे जणू प्रात्यक्षिकच ! दैवी लीला अचिन्त्य आहे, अकल्पित आहे हे खरे!

२००9 सालापासून सुरु झालेला हा प्रवाह कधी धडधडत, कधी थोडा हळू तर कधी अडथळे पार करीत निरनिराळी वळणे घेऊन आज इथवर येऊन पोहचलाय ( मध्य प्रदेश शिक्षण मंडळाशी संलग्न तीन औपचारिक शिक्षण देणाऱ्या शाळा). 60 मुले आश्रमात राहून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेताहेत.जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांनी लेपा येथे शाळेची अत्यंत डौलदार अशी वास्तु उभारून दिली आहे. भटयाण नावाच्या गावात नर्मदा मैयाच्या तटावर नर्मदालयाची स्वत: ची सुंदर वास्तू डौलात उभी राहिली आहे. रोजचा 400 मुलांना रोज पौष्टिक आहार दिला जातो. २०१५ सालापासून ‘रामकृष्ण सारदा निकेतन’ या नावाने या तिन्ही शाळा आहेत. भारतीताईच्या कल्पनेतील या शाळा आहेत . निसर्गाच्या सान्निध्यात झाडं, फुलं, फुलपाखरं, पाऊस, भुंगे, हिरवळ इ. बरोबर हसत खेळत शिक्षण, ही कल्पना, मुलांच्यात असलेल्या मूलभूत प्रवृत्ती ओळखून, त्यांच्यातील कलागुणांचा विचार करून त्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं जावं, असं शिक्षण.

गावातील मुलांचे शिक्षण आठवी-नववी नंतर थांबते. गावात शाळा नाही हे लक्ष्यात घेऊन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचीही सुरुवात झाली आहे. काही हुशार मुलांना पाबळ (महाराष्ट्र) येथे विज्ञानाश्रमात तांत्रिक शिक्षणासाठी पाठविले. भाभा परमाणु अनुसंधान केंद्र, मुंबई यांच्या ग्रामीण तंत्रज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सोलर ड्रायरचे उत्पादन देखील ही मुले करतात. भाभा परमाणु अनुसंधान केंद्राच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाशी संलग्नता असलेलं संपूर्ण मध्य भारतातलं हे एकमेव केंद्र आहे. या केंद्राचे उद्घाटन देखील पद्म विभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झालं.

नर्मदालयातील दिनचर्या पहाटे पाच वाजताच प्रार्थनेनं सुरु होते. मग साफसफाई, मुलांच्या अंघोळी,नाष्टा. संस्कृत स्तोत्र पठण, व्यायाम, कविता, गाणी, नृत्य निरनिराळी वाद्ये, हे सर्व मुलं आनंदाने करतात. आदि शंकराचार्य आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची असंख्य स्तोत्र या मुलांची कंठस्थ आहेत. भगवद्गीतेचे चार अध्याय, राम रक्षा, विष्णुसहस्त्रनाम यासारखे अनेक स्तोत्रे स्पष्ट आणि शुद्ध उच्चारात ही मुले म्हणतात तेव्हा ऐकणारा थक्क होऊन जातो. या आदिवासी मुलांच्या रक्तातच सूर आणि ताल असावा. त्यांच्यातले हे गुण ओळखून नर्मदालयात आता शास्त्रीय संगीत देखील शिकवले जाते. ती जबाबदारी मी घेतली आहे तर ताल वाद्य शिकवण्याची जबाबदारी इंदोरचे श्री विलास खरगोनकर यांनी स्वीकारली आहे. पहिली ते आठवीच्या सरकारी शाळेच्या पाठ्य पुस्तकातल्या सर्व हिंदी कविता ना चाली देऊन त्याचा एक सुरेख वाद्यवृंद या मुलांचा तयार झाला आहे. त्याचे कार्यक्रम महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये अनेक ठिकाणी झालेत. कवितां बरोबरच आदी शंकराचार्य आणि स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या अनेक स्तोत्त्रं स्वर बद्ध करून त्याचाही एक वाद्यवृंद ही मुलं सादर करतात. मला असं वाटतं अशा प्रकारचा हा भारतातला पहिला वाद्यवृंद असावा. अनेक नामवंत कलाकारांनी आणि गुणीजनांनी या वाद्यवृंदाचे भरपूर कौतुक केलेले आहे .

आश्रमातील कामं शिस्तीत पार पडतात. ताईंची करडी नजर त्यावर असते. सध्या नर्मदालय परिवारामधे 40 शिक्षिका व 8 प्रकल्प समन्वयक आणि 8 अन्य सहकारी आहेत. गावातील लोकांचे सहकार्य पाठीशी आहेच. भारती ताईंचे अथक परिश्रम, प्रत्येक मुलाला समजून घेण्याची त्यांची हातोटी, सौम्य स्वभावाच्या असूनही आवश्यक तेथे कठोर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता, गुरु निष्ठा इत्यादी बघून थक्क व्हायला होतं.

‘मोगरा फुलला’ या अभंगात ज्ञानेश्वर माउलींनी ज्या सद्गुरु कृपांकित वेलीच वर्णन केलंय ते जणू भारतीताईंच्या “नर्मदालय’ याला लागू पडतं. एका लहानशा बीजात केवढया मोठ्या वृक्षाची संभावना लपलेली असते. हे घडते त्या दैवी संकल्पामुळेच. भारती ताईच्या मनातील हे नर्मदालय देखील पुढे खूप मोठ व्हावं. या प्रवाहात ही मुलं, चिंब भिजोत. ताईंनी लावलेला हा इवलासा वेलु ‘गंगनावेरी’ जाऊ दे, हीच त्या परमेश्वराजवळ प्रार्थना!

सौ. शुभदा मराठे
इंदोर

Facebook –
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Blog –
https://narmada-bharati.blogspot.com/

Enquiry